अजय महाडिक, मुंबईसरकारी नोकरी लागल्यानंतर पदोन्नती व पगारवाढीची एक विशिष्ट शासन नियमावली आहे. त्यानुसार कर्मचा-यांची सेवाज्येष्ठता निश्चित होत असते. मात्र भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने सेवा शर्तीच्या शासन नियमावलीलाच केराची टोपली दाखवून तब्बल १० कर्मचाऱ्यांना सावत्र न्यायाने वागविले आहे.महापालिकेच्या सेवेत जून २००७ पासून बी. ई. सिव्हिल व डिप्लोमा इंजिनीअर ही शैक्षणिक पात्रता असणारे एकूण १० कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. आठ वर्षे होऊनही त्यांना कोणतीही पदोन्नती व त्यानुसार पगारवाढ मिळालेली नाही. मात्र याच अस्थापनेत १९९९ साली ठराव घेऊन पाच कनिष्ठ अभियंत्यांना ‘शाखा अभियंता वर्ग - २’ म्हणून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही वेळोवेळी पात्र कनिष्ठ अभियंत्यांना त्याचा लाभ झाला. मात्र २००७ च्या बॅचलाच वंचित ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र याबाबत आयुक्तांनी सांगितले, की २००७च्या बॅचला रुजू होताना मंजूर शर्तींनुसारच वागणूक देण्यात येत आहे. त्यामुळे बी. ई. सिव्हिल ही वरिष्ठ पदवी धारण करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना हा प्रकार आपल्यावर अन्याय झाल्यासारखा वाटत आहे आणि तशी कैफियत त्यांनी आयुक्त सोनोवणे यांच्याकडे मांडली आहे.
भिवंडी महापालिकेत पदोन्नतीवरून रस्सीखेच
By admin | Published: January 05, 2015 4:55 AM