लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीच्या निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणाऱ्या ४६० उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला शुक्रवारी दुपारपर्यंत होईल. आठ ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल आणि तासाभरात पहिला निकाल हाती येईल. दुपारी तीनपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा निवडणूक कार्यालयाने केला आहे. मात्र आतापर्यंत आॅनलाइन प्रक्रियेत पालिका अधिकाऱ्यांनी घातलेला घोळ पाहता निकाल नेमके किती वेळेत आणि कसे लागतील, याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे पनवेल महापालिका निवडणुकीचा निकालही शुक्रवारी लागणार असून याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.भिवंडीतील २३ प्रभागातील ९० जागांसाठी बुधवारी ५१ टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा साधारण पाच टक्के अधिक मतदान झाल्याने प्रत्येक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत. मतमोजणीसाठी २६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पनवेल महापालिकासाठी ५५ टक्के मतदान झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. भाजपा-आरपीआय युती, शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी, शिवसेना, मनसे यांपैकी कोणाच्या पदरात मतदारराजाने किती मतांचे दान टाकले, हे स्पष्ट होईल. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ७८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
भिवंडी - पनवेलचा कौल आज दुपारपर्यंत
By admin | Published: May 26, 2017 4:27 AM