भिवंडी : भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करण्याचे नियोजन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू असून याच ठिकाणी अद्ययावत लॉजिस्टिक पार्क, दळणवळणाच्या सोयी उपलब्ध केल्यास १० लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला.माणकोलीनाका येथील उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भिवंडीच्या विकासाचा आराखडा पूर्वीच्या सरकारच्या काळात तसाच पडून होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्याला गती दिली. भिवंडीतील विकासकामांकरिता ९८५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. एमएमआरडीएमध्ये समाविष्ट झालेल्या ६० गावांत उभारलेल्या गोदामांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे या भागात देशातील उत्तम लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येईल. याठिकाणी शाळा, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध असतील. संपूर्ण देशाच्या लॉजिस्टिकचे भिवंडी हे मुख्य केंद्र बनेल. या ठिकाणी १०लाख भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमून गावठाणांचा आदर्श विकास करणे, ग्रामस्थांना उत्तम मोबदला देऊन त्यासाठी जमीन संपादित करणे, या गोष्टी तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांना दिले.मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना टोलामुख्यमंत्री अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, आमच्याकडे आता पुढची दोन अडीच वर्षे आहेत. त्यामुळे आमची सर्व कामे आम्हाला या कालावधीत आटोपायची आहेत. आमच्या दृष्टीने वेगाला प्राधान्य आहे. वेगाने काम करणे शासनाचे दायित्व आहे. तुम्ही निवृत्तीपर्यंत इथे राहाल, पण आम्हाला जनतेला लागलीच कामे दाखवायची आहेत.
भिवंडीत इकॉनॉमिक कॉरिडॉर
By admin | Published: April 09, 2017 4:09 AM