रोहिदास पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्कअनगाव : भिवंडीचा महापौर काँग्रेसचाच होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी ‘लोकमत’ला दिली. महापालिकेची निवडणूक काँग्रेस व शिवसेना स्वबळावर लढले असून जनमताचा कौल काँग्रेसकडे आहे. गतवेळी काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे तुषार चौधरी महापौर होते. त्यामुळे या वेळी शिवसेना काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देईल, असे टावरे म्हणाले. शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. भिवंडीकरांनी जनमताचा भक्कम कौल काँग्रेस पक्षाला दिला असतानाही भाजपाचाच महापौर होणार असल्याचा दावा भाजपाचे विभागीय अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी केला आहे. याकडे टावरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य नाही. फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता हस्तगत करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपा सर्वच ठिकाणी करू पाहत आहे. मग, त्याला भिवंडी महापालिका तरी अपवाद कशी असणार. असे फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण केले नाही, तर भाजपाला चैन पडत नाही. काँग्रेसचे ४७ नगरसेवक असून, संपूर्ण बहुमत असतानाही आम्ही शहराच्या विकासाकरिता शिवसेनेला सोबत घेत आहोत. शिवसेनेचे १२ व समाजवादी पार्टीचे दोन असे ६१ नगरसेवकांचे संख्याबळ महापालिकेत काँग्रेससोबत असेल. काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. त्याखेरीज, शिवसेना सोबत आहे. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा महापौर झालेला असेल. काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत.- सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसशिवसेनेने काँग्रेससोबत येण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रस्ताव आला असून त्याबाबत चर्चा सुरू आहे.- सुभाष माने, भिवंडी शहर जिल्हाप्रमुख, शिवसेना
भिवंडीत महापौर काँग्रेसचाच होणार
By admin | Published: June 01, 2017 3:41 AM