भिवंडी : बसचालकाला आणि वाहतूक पोलिसाला मारहाण करून वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळताच त्यांनी मंगळवारी रिक्षाबंदचा निर्णय घेत प्रवाशांच्या कोंडीचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने या रिक्षाबंदच्या इशाऱ्याने पालक धास्तावले होते. मात्र, अन्य संघटनांनी दहावीचा विचार करून या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोंडीत भर घालणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या, कागदपत्रे सोबत नसलेल्या, गणवेश-बॅजचा नियम न पाळणाऱ्या आणि बसचालक, पोलिसांवरच हात उगारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच त्यांनी नल्ला रिक्षांवर व इतर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली आणि आम्ही नियमानुसार रिक्षा चालवत असून आम्हाला कारवाईने हैराण केले जात असल्याचा आरोप भिवंडी तालुका रिक्षाचालक-मालक महासंघाने केला आणि बंदची हाक दिली. दहावी परीक्षेच्या दिवशीच बंद पाळल्यास आपल्या मागण्या मान्य होतील, या उद्देशाने आंदोलनासाठी तो दिवस निवडण्यात आला.भिवंडीत नल्ला रिक्षांची संख्या वाढली असून त्यावर आरटीओ व स्थानिक वाहतूक पोलीस कठोरपणे कारवाई करीत नाहीत. महासंघाने वाहतूक शाखा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे रिक्षा स्टॅण्ड व इतर मागण्या करून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही रिक्षाचालक ड्रेस, बॅज, परमिट व कागदपत्रे बाळगत असूनही त्यांच्यावर कारवाई केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असा दावा संघटनेने केला आहे.भिवंडीतील जय महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर, रिक्षाचालकांकडून हल्ले झाल्याने वाहतूक विभाग सक्तीने कारवाई करीत आहे. यात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडे पोलीस दुर्लक्ष, दुजाभाव करीत आहेत. शहरातील काही पुढारी, पोलीस व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नल्ला रिक्षा असल्यानेच वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना अभय देत आहेत. बऱ्याच नल्ला रिक्षा सायंकाळी ४ ते सकाळी ९पर्यंत अवैध प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे अधिकृत रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडून त्यांचे नुकसान होते. (प्रतिनिधी)>निवडणुकांच्या तोंडावरच बंदची आठवण का? मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून काही संघटना बंदमध्ये सामील होणार नाहीत. निवडणुका जवळ आल्या की, दर पाच वर्षांनी असा बंद पुकारण्याची आठवण का होते, असा प्रश्न विचारत काही रिक्षाचालकांनी संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भिवंडीत आज रिक्षाबंद
By admin | Published: March 07, 2017 3:19 AM