ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 12 - अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन १५ आॅक्टोबरपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारच, असे सांगून १९-१९ (१९ फेब्रुवारी २०१९) अखेर स्मारकाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास शिवसंग्रामचे नेते आ़ विनायक मेटे यांनी व्यक्त केला़ आ. विनायक मेटे हे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे राहावे याबाबत ९ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती बैठक झाली. या बैठकीत स्मारकाच्या आराखड्याला (ले आऊटला) मंजुरी मिळाली आहे. १ महिन्यात या संदर्भात निविदा काढली जाणार असून १५ आॅक्टोबरपूर्वी या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. हे भव्य दिव्य स्मारक १९ -१९ ला पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीमधील घटक पक्षाची समन्वय समिती स्थापन केली आहे. या बाबतची एक बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाली. मात्र घटक पक्षातील काही अडचणी, समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर चर्चा करूनच सुटतील़ त्यासाठी घटक पक्षाची बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री यांना पत्रही पाठवले असल्याचे आ़ विनायक मेटे यांनी सांगितले. आपण मंत्रिमंडळात कधी सामील होणार? असा प्रश्न उपस्थित केल्यावर आ. मेटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला कॅबिनेट मंत्री करणार, असा शब्द दिला आहे. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात, आता माझ्याबाबतही पाळतील, असे आ. मेटे यांनी सांगितले़मराठा आरक्षणाचा मुद्दा अजेंडाच मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची आग्रही मागणी होती, आजही आहे. हा मुद्दा मी कधीही सोडला नाही. तो आमचा अजेंडा आहे़ आरक्षण मिळावे यासाठी अधिवेशनात प्रश्नही उपस्थित केला होता. बाकीचे भाषणबाजी करतात. जेथे बोलावे तेथे बोलत नाही आणि लोकांपुढे कळवळा व्यक्त करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आ़ नारायण राणे यांनी चांगला प्रस्तार्व दिला. याबाबत न्यायालयातील केस लवकर बोर्डावर येईल, असा विश्वासही आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केला.
१५ आॅक्टोबरपूर्वी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन- विनायक मेटे
By admin | Published: August 12, 2016 10:24 PM