मुंबई : भोपाळमध्ये सिमीच्या आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेली चकमक बनावट असल्याचा दावा ‘भारत बचाव’ आंदोलनचे जावेद आनंद यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणीही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली आहे.भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि भोपाळमधील चकमक या प्रकरणांचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत करण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेशात ‘व्यापम’ घोटाळ््यातील ५०हून अधिक संशयितांचा बळी गेल्यामुळे, किमान या बनावट चकमकीबाबत तरी न्याय्य चौकशीची गरज असल्याचे मत आनंद यांनी व्यक्त केले.या वेळी ज्येष्ठ पत्रकार फिरोज मिठीबोरवाला म्हणाले की, चकमकीनंतर व्हायरल झालेले व्हिडीओ, फरार दहशतवाद्यांच्या अंगावरील कपडे आणि विविध पुराव्यांमुळे या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मृत पावलेला सुरक्षा रक्षकही बनावट चकमकीचा बळी ठरल्याचा गंभीर आरोप मिठीबोरवाला यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीय यंत्रणाही सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी केवळ न्यायालयामार्फतच करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
भोपाळ चकमक बनावटच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 5:44 AM