हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोरोना महामारीत ग्रामीण भागात चाचण्या किंवा इतर आवश्यक सुविधा मोठ्या कष्टाने उपलब्ध असताना भोसी (जिल्हा नांदेड) खेड्याने महामारीला ज्या पद्धतीने तोंड दिले त्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रशंसा केली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश देशमुख- भोसीकर यांनी केलेल्या कमालीच्या परिणामकारक कामाची सरकारने गुरुवारी अधिकृतपणे त्याची नोंद घेतली.
दोन महिन्यापूर्वी लग्न समारंभानंतर भोसीतील मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यानंतरच्या आठवड्यात आणखी पाच रुग्ण आढळल्यानंतर गावात एकच क्षोभ निर्माण झाला. प्रकाश देशमुख यांनी गावात कोविडच्या चाचण्या घेण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. रॅपिड अँटिजन टेस्ट आणि आरटी-पीसीआर चाचण्यातून ११९ जण कोविड-१९ सकारात्मक (पॉझिटिव्ह) असल्याचे स्पष्ट झाले.
पंतप्रधानांनी दिली पावतीग्रामीण भागात असलेल्या आव्हानांवरून इशारा दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या विषयाची माहिती दिली. ते म्हणाले,‘ग्रामीण भागात लोकांमध्ये कोविड-१९ बद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पंचायत राज व्यवस्थांकडून सहकार्य मिळविणे, हे सारखेच महत्त्वाचे आहे.’
कोरोना विषाणू फैलावाची साखळी तोडण्यासाठी या रुग्णांचे विलगीकरण करण्याचे ठरवले गेले. या पॉझिटिव्ह लोकांनी त्यांच्या शेतात १५ ते १७ दिवस राहावे यासाठी त्यांचे मन वळवण्यात आले. ज्या पॉझिटिव्ह लोकांना शेत नव्हते त्यांची सोय भोसीकर यांच्या स्वत:च्या शेतात ४० बाय ६० फूट आकाराच्या तात्पुरत्या निवाऱ्यात (शेड) करण्यात आली. आशाताई या अंगणवाडी सेविका रोज शेतांना भेट द्यायच्या. १५ ते २० दिवसांच्या विलगीकरणानंतर ग्रामस्थांची पुन्हा आरोग्य तपासणी केली गेली व त्यानंतरच ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले.