ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - छगन भुजबळ यांनी महात्मा फुलेंचे नाव घेत तीन फुल्यांचे राजकारण करत इमारतींचे इमले उभारले, समतेचे राज्य त्यांनी स्वतःच्या कुटुंबापुरतेच आणले, मात्र ते आता बुडाले आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळप्रकरणावर टीका केली आहे. भुजबळांची सच्चाई ही भूंकपाप्रमाणे जमीन फाडून बाहेर आली असेही त्यांनी म्हटले आहे.
गुरुवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर टीकेची झोड उठवली. भुजबळ शिवसेनेत असतानाच त्यांचे हे उद्योग सुरु होते, पण शिवसेना अशा गोष्टीना पाठिंबा देत नसल्याने भुजबळ राष्ट्रवादीत गेले असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ, कृपाशंकर सिंह यांच्यासारखे भाजीविक्रेते ऐवढे श्रीमंत झाले मग शेतक-यांना श्रीमंत का नाही होता आले असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
फुले, शाहू, आंबेडकर व बहुजन समाजाचे नाव घेत राहायचे आणि श्रीमंत व्हायचे हीच भुजबळांच्या सामाजिक क्रांतीची सच्चाई आहे. ही सच्चाई आता भूंकपाप्रमाणे जमीन फाडून बाहेर आली आहे असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे. एसीबीने कारवाई केली, पण न्यायालयाने दखल घेण्यापूर्वी नवीन सरकार सत्तेवर येताच भुजबळांवर कारवाई व्हायला पाहिजे होती असे सांगत उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारलाही चिमटा काढला आहे.