यवतमाळ - गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यात जरांगे पाटलांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध करत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या विधानानंतर मराठा-ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्यातच आज ओबीसी नेते हरीभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले की, हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठा-ओबीसीत गेल्या दीड महिन्यापासून तणावाचे वातवरण आहे. आम्ही गुण्यागोविंदाने राहत आहोत. मराठा-ओबीसी भाऊ भाऊ आहे. मराठा समाज ओबीसी होणार असेल तर आम्ही भाऊ भाऊ आहोत.छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही. भटके विमुक्ते, बारा बलुतेदार हा समाज जास्त आहे. त्या समाजाचे नेतृत्व आम्ही करतोय.बारा बलुतेदारांना ओबीसीत वेगळं आरक्षण आहे. देशात रोहिणी आयोग महत्त्वाचा आहे. हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच १९६७ मध्ये वसंतराव नाईकांनीच कुणबी समाजाला आरक्षण दिले. देशात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटक्याविमुक्तांना आरक्षण देणारे वसंतराव नाईक आहेत. ही त्यांची कर्मभूमी आहे. वसंतराव नाईक यांना आम्ही विसरू शकत नाही. हिंगोली, जालनात झालेली भाषणे ही तेढ निर्माण करणारी आहेत. टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे परंतु तुम्ही समाजासाठी काय केले? बारा बलुतेदारांसाठी काय केले? भुजबळांनी ओबीसीसाठी कुठल्या योजना आणल्या? अजूनही निधी मिळत नाही.अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यावर आम्ही लढतोय असं हरीभाऊ राठोड यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्यात शांतता राहावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली. बारा बलुतेदार, ओबीसी समाजाच्या पाठीशी मराठा समाज कायम आहे. येवल्यातला एक माणूस मराठा आणि ओबीसीत भांडणे लावतोय.एकट्याने ऐकू नका. त्याचे ऐकलं नसते तर बारा बलुतेदार यांच्या वाटोळे झाले नसते. मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन गावोगावी करतोय. पडळकर, जानकर, शेंडगे यांना माझी विनंती आहे की, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही त्यांचे ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करू नका. ज्याला खायची सवय लागलीय त्याला धक्का लावतोय या नावाखाली वाद लावायची सवय लागलीय. माझा समाज शांततेचे आवाहन स्वीकारतोय. आरक्षण २ दिवस पुढे गेले तरी चालेल परंतु माझ्या समाजाचा घात होऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.