ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 25 – माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी 14 मार्चला 11 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती.
१८ एप्रिलला छगन भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भुजबळ यांना दातदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास होता. रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांचा रक्तदाब १८०-१२० इतका होता. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले, पण अजूनही दातांचे उपचार पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळेच सोमवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात भुजबळ यांच्या दातांचा एक्सरे काढला जाणार असून, पुढील उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. सिक्वेरा यांनी दिली होती.
दरम्यान भुजबळ यांनी रुग्णालयात दाखल करण्यावरुनही वाद निर्माण झाला होता. भुजबळ यांनी दाढदुखीची तक्रार केल्याने त्यांना तुरूंगाबाहेर जाऊन सरकारी दंतवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात आल्याचे समोर आले होते. मग अचानक त्यांच्या छातीत कसे दुखू लागले? आणि त्यावरील उपचारांसाठी त्यांना कार्डिओलॉजी विभाग नसणा-या सेंट जॉर्ज रुग्णालयात कसे दाखल करण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
वैद्यकीय कागदपत्रांत फेरफार केल्याचे समोर येताच कारागृह विभागाने डॉ. राहुल घुले यांची मुंबई मध्यवर्ती कारागृहाकडील प्रतिनियुक्ती रद्द करून आरोग्य विभागात रवानगी केली आहे.