ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची आॅर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसे पत्रच त्यांनी तुरुंग विभागाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांना पाठविले आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ सध्या आॅर्थर रोड तुरुंगात असून, त्यांची तिथे विशेष बडदास्त ठेवली जात आहे. कारागृहातच पाच फुटी टीव्ही बसविण्यात आला असून, त्यावर भुजबळ हिंदी सिनेमे पाहतात. शिवाय, त्यांना जेवणासाठी चिकन मसाला, दर दोन तासांनी फळे पुरविली जात असल्याचा आरोप दमानिया यांनी भूषणकुमार उपाध्याय यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. शिवाय, समीर भुजबळांसाठी तुरुंगातच दारू पोहोचविण्यात येत आहे. नारळपाण्याच्या नावाखाली तुरुंगात व्होडका पोहोचत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. भुजबळांना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीबाबत तुरुंगात काम करणाऱ्या लोकांनी माहिती दिल्याचा दावा दमानिया यांनी केला. जानेवारी महिन्यापासून हा सारा प्रकार सुरू आहे. समीर भुजबळ रोज सकाळी तीन तास मोबाइलवर बोलत असतात. त्यासाठी मोबाइल जॅमरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा दमानिया यांनी उपाध्याय यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. भुजबळांना न्यायालयात हजर करताना नियम धाब्यावर बसवून अनेक लोक त्यांना भेटले. यात मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळी होती. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या येऊनही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला. - अंजली दमानिया यांची तक्रार मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. दमानिया यांनी यापूर्वी जे आरोप केले होते त्याबाबत याआधीच त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली होती, असेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले.