मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना ७ जूनपर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे.गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने मेडिकल बोर्डाला सीलबंद अहवाल तपास यंत्रणेपुढे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारच्या सुनावणीवेळी मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी सीलबंद अहवाल सादर केला. भुजबळ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अशोक देसाई यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. वैद्यकीय अहवाल तांत्रिकरीत्या समजून घेण्यासाठी व खासगी डॉक्टरांचे या अहवालावर मत घेण्यासाठी याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्याची विनंती अॅड. देसाई यांनी उच्च न्यायालयाल केली. मात्र अॅड. कंथारिया यांनी यावर आक्षेप घेत भुजबळ खासगी डॉक्टरांकडून त्यांना हवा तसा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतील. जे.जे.मध्ये नऊ तज्ज्ञ डॉक्टरांनी भुजबळ यांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या. त्यांच्या मते भुजबळांना नियमितपणे औषधे देणे आवश्यक आहे. त्यापूर्वीच कारागृह प्रशासन त्यांना वेळोवेळी आणि नियमितपणे औषध देत आहे. त्यामुळे या अर्जावर तत्काळ निर्णय घ्या, अशी विनंती अॅड. कंथारिया यांनी केली.न्या. शालिनी फणसाळकर - जोशी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर अॅड. देसाई यांनी अन्य डॉक्टरांचे मत घेण्यासाठी ७ जूनपर्यंत भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली. त्यामुळे भुजबळ यांना ७ जूनपर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे.
भुजबळांना ७ जूनपर्यंत दिलासा नाही
By admin | Published: May 28, 2016 1:34 AM