मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी जे. जे. रुग्णालयाने सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात अनेक त्रुटी असल्याचे म्हणत या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आक्षेप घेत भुजबळांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली. त्यामुळे उच्च न्यायालयाने भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी १६ जून रोजी ठेवली आहे.छगन भुजबळ यांनी अनेक आजार असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी तात्पुरती सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे होती.विशेष पीएलएलए न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर भुजबळांनी मे महिन्यात उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन न्यायालयापुढे जामीन अर्ज केला. त्या वेळी उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना मेडिकल बोर्ड गठित करण्याचे निर्देश देत भुजबळांच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याचा आदेश दिला.त्यानुसार जे. जे. रुग्णालयाचे डॉ. लहाने यांनी नऊ तज्ज्ञ डॉक्टरांचे बोर्ड गठित करून २४ मे रोजी भुजबळांच्या चाचण्या केल्या. त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला. तसेच भुजबळांच्या वकिलांनाही देण्यात आला.मात्र या वैद्यकीय अहवालात अनेक त्रुटी असल्याचे भुजबळांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. ईडीने छगन भुजबळ यांना १४ मार्च रोजी अटक केली होती. (प्रतिनिधी)
वैद्यकीय अहवालावर भुजबळांचे प्रश्नचिन्ह
By admin | Published: June 15, 2016 4:19 AM