मुंबई : अस्वस्थ वाटू लागल्याने छगन भुजबळ यांना शनिवारी सायंकाळी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. डोकेदुखी, अंगदुखी, ताप या लक्षणांमुळे त्यांना डेंग्यू झाल्याची चर्चा होती. मात्र त्यांचे डेंग्यूचे चाचणी अहवाल निगेटिव्ह असून त्यांना व्हायरल फिवर झाल्याची माहिती जे. जे.चे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. महाराष्ट्र सदन घोटाळ््यात छगन भुजबळ मुख्य आरोपी आहेत. सध्या ते आॅर्थर रोड कारागृहात आहेत. शनिवारी त्यांची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. भुजबळ यांना डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप होता. त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली. मात्र अहवाल नेगेटिव्ह आला. ताप असताना प्लेटलेट्सही कमी झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.भुजबळ यांना संधिवात आणि हृदयविकाराचाही त्रास आहे. भुजबळांच्या अन्य काही चाचण्या सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले. एप्रिल महिन्यातही भुजबळांची प्रकृती ढासळली होती. त्या वेळी त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
भुजबळांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
By admin | Published: September 19, 2016 5:29 AM