डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या पैशांतून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी इंडोनेशियामध्ये ३० कोटी रुपयांत कोळसा खाण विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अनधिकृत माध्यमातून ही बाब समोर आणली आहे. ईडीच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांनी भारतात कायदेशीररित्या जरी तेवढ्या किमतीची मालमत्ता खरेदी केली असेल तर तीदेखील दुसऱ्या टप्प्यात हस्तगतकेली जाईल.सिंगापूरमध्ये समीर आणि पंकज भुजबळ यांनी आर्मस्ट्राँग ग्लोबल आणि आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्या स्थापन केल्या. भारतात त्यांनी स्थापन केलेल्या आर्मस्ट्राँग इंजिनियरिंग या कंपनीच्या माध्यमातून सुमारे ३० कोटी रुपये वरील दोन कंपन्यांना पाठविले. या कंपन्यांच्या खात्यांतून हवालाच्या माध्यमातून इंडोनेशियात खाण खरेदी करण्यासाठी पैसे वापरण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. भुजबळ मंडळी या व्यवसायात आले असले तरी त्यांना खाणीचा व्यवसाय सुरू करता आलेला नाही कारण त्यांना त्यासाठी आणखी दोन ते तीन परवाने मिळायचे आहेत.‘‘या संदर्भात (इंडोनेशियातील खाण) आम्हाला आमच्या तेथील अशाच यंत्रणेकडून दुजोरा (परंतु अनधिकृत) मिळालेला आहे. आम्ही त्यांना या व्यवहाराचा तपशील मागणारे रोगेटोरी लेटर (न्यायालयाने विदेशातील न्यायालयाला मदतीसाठी पाठवायचे पत्र) पाठविल्यानंतर ते अधिकृतपणे तपशील पाठवतील, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याने ईडीला असे अधिकार बहाल केले आहेत की गुन्ह्यातून मिळविलेल्या पैशांतून आरोपीने विदेशात मालमत्ता मिळविली असेल तर त्या किमतीची देशातील मालमत्ता जप्त करता येते. इंडोनेशियातील खाणीच्या किमतीएवढी भारतातील मालमत्ता जप्त करणार आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
इंडोनेशियात भुजबळांनी घेतली ३० कोटींची कोळसा खाण
By admin | Published: May 10, 2016 3:54 AM