ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १५ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. भुजबळांच्या अटकेशी राज्य सरकारचा काही संबंध नाही. ईडीने पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय हेतून प्रेरित होऊन भुजबळांवर कारवाई केल्याचा आरोप केला आहे. तर विधानसभेतही विरोधकांनी भुजबळांच्या अटकेप्रकरणी गोंधळ घालत निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी भुजबळांचं चौकशीला सहकार्य असताना मग अटक का ? असा सवाल विचारत भुजबळांची अटक पुर्वनियोजीत असल्याचा आरोप केला होता.
घोटाळे झाले असतील तर सरकारने हातावर हात ठेवून शांत बसायचं का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला. कोणत्याही सुडाच्या भावनेने राज्य सरकार कधीही कारवाई करणार नाही असं सागंत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले. तत्पुर्वी विधानसभेत भुजबळांच्या अटकेप्रकरणी स्थगन प्रस्ताव देण्यात आला होता जो विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला.