मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी विशेष ‘पीएलएमए’ (प्रीव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने या जामीन अर्जावर सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.छगन भुजबळ १७ मार्च २०१६ पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. तेव्हापासून त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले नाही. याचाच अर्थ त्यांच्या ताब्याची आवश्यकता नाही. तसेच भुजबळ यांच्यावर २७ एप्रिल २०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेले एक वर्ष भुजबळ कारागृहातच खितपत पडून आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, असे भुजबळ यांच्या वकिलांनी जामीन अर्जात म्हटले आहे.भुजबळ यांचे वकील शलभ सक्सेना यांनी न्यायालयाला सांगितले. के. एस. चमणकर किंवा अन्य आरोपींनी भुजबळ यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कंत्राटाच्या मोबदल्यात पैसे दिल्याचे पुरावे नाहीत, असेही अर्जात म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने ईडीला उत्तर देण्याचे निर्देश दिले.
भुजबळांचा जामिनासाठी कोर्टात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 4:53 AM