मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांची होळी साजरी करण्यासाठी जामिनावर तात्पुरती सुटका करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे भुजबळ यांना होळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.छगन भुजबळ यांनी धुलिवंदन साजरा करण्यासाठी जामिनावर तात्पुरती सुटका करण्यात यावी, असा अर्ज विशेष प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रीग अॅक्ट (पीएमएलए) दिला होता.‘मी ज्येष्ठ व चांगला नागरिक आहे. मी खरा भारतीय असून, आतापर्यंत मी गरीब लोकांना मदत केली आहे. त्यात शेतकरी व अपंग व्यक्तींचा समावेश आहे. या कामांमुळे मला समाजात आदर मिळाला आहे. मी उत्तम प्रशासक आणि एक चांगला नेता आहे. मला राजकारणाचा बळी करण्यात आले आहे,’ असे भुजबळ यांच्या जामीन अर्जात म्हटले होते. त्यांच्या जामीन अर्जावर तपास यंत्रणेने आक्षेप घेतला. पीएमएलएमध्ये अशा प्रकारच्या तात्पुरत्या जामिनाची तरतूद नाही. त्यामुळे अर्जात नमूद करण्यात आलेल्या मुद्यांमध्ये अर्थ नाही, असा युक्तिवाद सक्तवसुली संचालनालयाचे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी केला.महाराष्ट्र सदनाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडून लाच स्वीकारल्याचा आणि त्यांच्यामुळे सरकारच्या तिजोरीला ८८७ कोटी रुपयांचा फटका बसल्याचा भुजबळ यांच्यावर आरोप आहे. मंत्री असताना भुजबळ यांनी सरकारी कामांचे कंत्राट देताना कंत्राटदारांकडून लाच स्वीकारून आपले नातेवाईक संचालक असलेल्या कंपन्यांमध्ये ते गुंतवले आणि हवाला व्यवहाराद्वारे ते परदेशी पाठवले असाही आरोप भुजबळ यांच्यावर आहे. भुजबळ यांना १४ मार्च रोजी ईडीने ताब्यात घेतले. विशेष न्यायालयाने त्यांना ३१ मार्च रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
भुजबळांची होळी कारागृहातच
By admin | Published: March 24, 2016 1:56 AM