ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात एसीबी व ईडीने केलेल्या कारवाईनंतर शरद पवारांनी आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी योग्यवेळी बोलेन असं म्हणत पवारांनी कारवाईच्या बातम्यांनंतर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.
कायद्याचा हात धरून आम्ही छगन भुजबळांच्या पाठिशी आहोत, कोणताही निर्णय त्यांनी एकट्याने घेतला नव्हता मग त्यांनाच लक्ष का केले जात आहे, तसेच एसीबीने केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांसमोर कशी येते असे प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी राज्य सरकारला विचारले. त्याचप्रमाणे हे सरकार आम्हाला कधी तुरूंगात टाकतंय याची आम्ही वाट बघतोय अशा तिखट शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली. त्याचप्रमाणे, कारवाईचा तपशील माध्यमांसमोर आणून जाणिवपूर्वक माझ्या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर छगन भुजबळ कारवाईनंतर पहिल्यांदाच पवारांच्या भेटीला गेले होते. पवारांचे अभिनंदन करण्यासाठी आपण गेलो होतो असे भुजबळांनी सांगितले असून भुजबळ व पवार यांच्यात २० मिनिटं चर्चा झाली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी भुजबळांवर कायद्यानुसारच कारवाई होत असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.