नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मात्र, छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून विरोध होत आहे. त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाला आव्हान छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघातून विरोध होत आहे. छगन भुजबळ आज गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधीच छगन भुजबळांना विरोध करण्यात येत आहे. तसेच, छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये छगन भुजबळांना गावबंदी करायला महाराष्ट्राचा ७/१२ तुमच्या नावावर आहे काय? या विधानाची आठवण करून देत सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे, गावाच्या बांधावर येऊ नये, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा आहे, असे म्हटले आहे.
याचबरोबर, छगन भुजबळ यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दौरा करणार असल्याचे पत्रक जाहीर केले. यानंतर लासलगाव परिसरातील जवळपास ४६ गावांतील प्रतिनिधींची बैठक बुधवारी लासलगाव बाजार समितीच्या आवारात झाली. सोशल मीडियावरील आवाहनावरून ही बैठक झाली. त्याला मोठी गर्दी जमली होती. या बैठकीतील चर्चा व माहिती गोपनीय ठेवण्याची व त्यातील निर्णयावरील माहिती आज जाहीर करण्याचा निर्णय झाला. सकल मराठा समाजाच्या आवाहनावरून ही बैठक झाली. त्यात लासलगाव-येवला परिसरातील ४६ गावांतील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मला गावबंदी कोणी करू शकत नाही : छगन भुजबळअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बुधवारी रात्री येवल्यात दाखल झाले. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीमध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात येते असेही छगन भुजबळ म्हणाले.
व्हायरल ऑडिओ क्लिप?ग्रामस्थ : भुजबळ साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो येऊ नका, आमच्या गावच्या बांधावर येऊ नका....छगन भुजबळ: बघू काय करायचे ते? ग्रामस्थ : तुम्ही आले तर वातावरण खराब होईल. सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे गावाच्या बांधावर येऊ नये छगन भुजबळ: बरं....ग्रामस्थ : जमीनीचा ७/१२ आमच्या बापाचा आहे. छगन भुजबळ: मला कोणी म्हटलं या तर मी जाईल, नाही म्हटलं तर बघू...ग्रामस्थ : तुम्हाला कोणी या म्हणत नाही... आमच्या गावचा ठराव झाला आहे. त्यामुळे तुम्ही येऊ नका.. छगन भुजबळ: तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का?