औरंगाबाद - आयात केलेले आणि विधानपरिषदेवर निवडू गेलेल्या लोकांना मंत्रीपद दिले जात असल्याची नाराजी मराठवाड्यातील शिवसेना आमदारांमध्ये असल्याची चर्चा पहायला मिळत होती. मात्र, नाराजी नसल्याचे व शपथविधीला जाणारच म्हणणारे पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. तर औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी सुद्धा शपथविधीला जाण्यास टाळले.
दुसऱ्या पक्षातील आलेल्यांना लगेच मंत्रिपद दिले जाते, मात्र निष्ठावंत यांना डावलले जात असल्याने, शपथविधीपूर्वी मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार नाराज असून शपतविधीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु होती. या विषयी लोकमतशी बोलताना संदीपान भुमरे यांनी, कोणतेही नाराजी नसून आपण शपथविधीला जाणारच असे म्हणाले होते. मात्र, मुंबईत शपथविधी सोहळा पार पडत असताना संजय शिरसाठ आणि भुमरे हे आपल्या मतदार संघात ठाण मांडून बसले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने दोन्ही आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.
संदीपान भुमरे हे पैठण मतदार संघातून चौथ्यांदा आमदार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यातच, आमदार शिरसाठ यांना सुद्धा मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, नव्यानेच राष्ट्रवादीतून शिवसनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषेदेतील आमदार तानाजी सावंत यांना संधी देण्यात आली. त्यामुळे, भुमरे आणि शिरसाठ यांनी शपथविधीकडे पाठ फिरवल्याने शिवसेनेमधील नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.