मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडॉऊन करण्यात आले आहे. मात्र असे असतानाच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या दारू घेताना सापडल्या आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे तृप्ती देसाई संतापल्या असून हा व्हिडिओ फेक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भूमाता ब्रिगेडच्यावतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक वेळा दारूबंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे भूमाता ब्रिगेडने जनादेश यात्रेवेळी फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन करायचे ठरवले होते. त्यानुसार त्यांना दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा हार घालण्याचा कार्यक्रम ठरला होता. मात्र, यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतानाच ताब्यात घेतले होते. त्या वेळचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागला आहे.
यासंदर्भात लोकमतशी बोलताना, आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दारूबंदीची मागणी केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यापार्श्वभूमीवर, आम्ही फडणवीस यांच्या जनादेश यात्रेवेळी दारूबंदीसाठी त्यांना रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा हार घालणार होतो. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले. तेव्हाचा व्हिडिओच आता व्हायरल करून आपली बदनामी केली जात आहे. देशावर कोरोनाचे संकट असताना सोशल मीडियाचा, अशा पद्धतीने वापर करणे चुकीचे आहे. यासंदर्भात आपण सायबर सेलकडे गुन्ह दाखल करणार आहोत. तसेच, गृहमंत्र्यांना फोन करून यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही करणार आहोत, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळ सध्या बरेच जण मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करत आहेत. त्यांनी कुठल्याही व्हिडिओची सत्यता पडताळ्या शिवाय ते फोरवर्ड करू नयेत, असे आवाहन आपण लोकमतच्या माध्यमातून करत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.