भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धात केला आहे. तसंच त्यांनी भाजपनं उमेदावारी दिल्यास इतिहास रचू असा विश्वासही व्यक्त केलाय. “बारामती लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवणार हे १०० टक्के खरं आहे. बारामती मतदार संघात सध्या परिवर्तन हवं आहे. २०१४ नंतर आता आम्हाला वाटलं त्यांच्याबरोबर जे पदाधिकारी काम करतायत, कार्यकर्ते काम करतायत, त्यातील एखादा पदाधिकारी उमेदवार म्हणून २०२४ ला येईल असं वाटलेलं. परंतु आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळेच बारामती लोकसभेसाठी फिरताना दिसतायत,” असं तृप्ती देसाई म्हणाल्या. “कुठेतरी घराणेशाहीला विरोध केलाच पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.
“गेले १५ वर्ष तिच व्यक्ती खासदार म्हणून येतेय. घराणेशाहीला आमचा विरोध आहे. यापूर्वी शरद पवार खासदार होते, अजित पवार खासदार होते, त्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्यावर महिला खासदार या मतदारसंघाला मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला होता. पण पुन्हा त्याच २०१४ ला उभ्या राहिल्या. कार्यकर्ते पदाधिकारी इतकी वर्ष काम करतायत ते केवल सतरंजी उचलायलाच आहेत का? शरद पवारांची लेक विरुद्ध सर्वसामान्यांची लेक, जी मी तळागाळात काम करतेय अशा पद्धतीची लढाई करणं गरजेचं आहे. जनतेची मागणी आहे मी इकडे उभं राहावं. बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होणार आहे,” असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.
राजीनाम्यावर वक्तव्य
“शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला तेव्हा मला वाटलं त्यांचा वारस म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून तरी घेतलं जाईल. परंतु त्या तिकडेही सक्षम ठरल्या नाहीत. त्यामुळे शरद पवारांनाच त्या पदावर राहायला लागलं. त्या तिकडं सक्षम नाहीत तर बारामती लोकसभा मतदारसंघात तर अजिबातच नाहीत,” असं त्यांनी नमूद केलं.
इतिहास घडवेन
माझ्यासारखी महिला खासदार या बारामती मतदार संघात असती तर प्रत्येक प्रत्येक २० किलोमीटरवर तुम्हाला शौचालयं उभी दिसली असती. अनेक डोंगराळ भागात तिकडे रुग्णालये नाही, सोयीसुविधा नाही, तुमच्याकडे इतकी वर्ष मतदारसंघ असून कामं झालेली नाहीत. त्यामुळे लोकांना एक नवा जनतेतला चेहरा हवा. जर भाजपनं मला उमेदवारी दिली तर १०० टक्के मी इतिहास घडवून शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.