दक्षिणचा आखाडा : सकाळी कोहळे तर तासभराने पडोळेंनी फोडले नारळ नागपूर : निवडणुका तोंडावर आल्या की विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी इच्छुक व पदसिद्ध उमेदवारांमध्ये स्पर्धा लागते. असाच काहीसा प्रत्यय दक्षिण नागपुरातील जानकीनगरात मंगळवारी आला. उदयनगर रिंग रोड चौक ते जानकीनगर रस्त्याच्या डांबरीकरणाचे स्थानिक नगरसेवक सुधाकर कोहळे यांनी उदयनगर चौकात सकाळी भूमिपूजन केले, तर तासाभराने आ. दीनानाथ पडोळे यांनी याच रस्त्यावर चक्क कोहळे यांच्या घरासमोर भूमिपूजन केले. दोन्ही नेत्यांनी या भूमिपूजनाचा आपला पहिला हक्क असल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. उदयनगर रिंग रोड चौक ते जानकीनगर हा मुख्य रस्ता व जानकीनगरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने ३२ लाख रुपये तर राज्य सरकारने १० लाख रुपये अनुदान दिले आहे. शासकीय अनुदानातील १० लाखाचे काम नासुप्र करणार आहे. तर ३२ लाखाचे काम महापालिकेने डी.सी. गुरुबक्षानी या कंत्राटदारास दिले आहे. मंगळवारी या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नेत्यांमध्ये चांगलीच चढाओढ पहायला मिळाली. जलप्रदाय समितीचे अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक सुधाकर कोहळे यांनी सकाळी ९.३० च्या सुमारास उदयनगर चौकात या कामाचे भूमिपूजन केले. याच रस्त्यावर कोहळे यांचे घर आहे. तासभराने आ. दीनानाथ पडोळे आपल्या समर्थकांसह कोहळे यांच्या घरासमोर आले व नारळ फोडून भूमिपूजन केले. या दोन भूमिपूजनामुळे स्थानिक नागरिकांची गोची झाली. काहींना कोहळेंच्या कार्यक्रमात जावे लागले तर काहींना पडोळेंच्या. तर काही नागरिकांनी राजकीय वादात आपण पडायला नको, अशी भूमिका घेत आपल्या घरीच राहणे पसंत केले. एकाच कामाचे कोहळे व आ. पडोळे या दोघांनीही भूमिपूजन केल्याची एकच चर्चा या परिसरात दिवसभर रंगली. कुणी म्हणायचे काम पडोळेंमुळे होत आहे, तर कुणी म्हणायचे कोहळेंमुळे मंजुरी मिळाली. नेत्यांमधील स्पर्धेमुळे नागरिकांना मात्र काम लवकर सुरू करून घेण्यात यश आले, एवढे नक्की.(प्रतिनिधी)
एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन
By admin | Published: July 09, 2014 1:00 AM