ऑनलाइन लोकमतठाणे, दि. २६ - ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील येऊर येथे बांधण्यात येणा-या ६५ क्रमांक शाळेच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते, महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या समारंभास वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका उज्ज्वला फडतरे, स्थानिक नगरसेवक मुकेश मोकाशी, उपायुक्त संदीप माळवी, युवा सेनेचे पुर्वेश सरनाईक, माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे, नगर अभियंता रतन अवसरमोल, कार्यकारी अभियंता नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी याच शाळेचा विद्यार्थी किशोर काशीनाथ म्हात्रे याचा मल्लखांबमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवल्याबद्दल ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून धोकादायक झालेली येऊर येथील शाळा क्रमांक ६५ पाडून टाकण्यात येऊन त्या ठिकाणी नवीन भव्य अशी तळ अधिक २ मजल्याची आरसीसी इमारत बांधण्यात येणार आहे. या शाळेच्या इमारत बांधणीसाठी एकूण १ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकूण ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या इमारतीमध्ये एकूण १२ वर्ग खोल्या, कार्यालय, २ संगणक खोल्या, २ प्रयोगशाळा खोल्या, ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली, स्टोअरसाठी स्वतंत्र खोली, मुला-मुलींसाठी शौचालय अशा सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीमधून यातील प्रयोगशाळा, व्यायामशाळा, संगणक खोल्या आणि ग्रंथालय बांधण्यात येणार आहेत.(छायाचित्र- विशाल हळदे)
येऊर येथील शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न
By admin | Published: December 26, 2016 4:07 PM