मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून युतीचा निर्णय कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहे. पैठणचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना सुद्धा पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्याने त्यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोठ्याप्रमाणावर इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. तर हा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी स्थानिक नेत्यांनी पक्षातील वरिष्ठांची भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मतदारसंघात कार्यक्रमांचा आणि सभांचा धडका सुद्धा लावला होता.
मात्र आता भुमरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने, भाजपच्या इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युतीचे ज्याप्रमाणे काम केले होते. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा काम करण्याचे आदेश दोन्ही पक्षांकडून मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरीही युतीचे निर्णय काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तालुक्यातील जनतेला शब्द दिला होता की, आमदार संदीपान भुमरे यांच्या विरोधात लढणार. त्याप्रमाणे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भाजप-शिवसेनेची युती झाली तर मी अपक्ष निवडणूक लढवणारआहे . दत्ता गोर्डे ( भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष )