ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. 07 - शेतीच्या वादातून बोदवड येथे झालेल्या खून प्रकरणी एका आरोपीस जन्मठेपेची तर अन्य दोघांना दहा वर्ष व दोन वर्षाची शिक्षा भुसावळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.एस.सी.मोरे यांनी शुक्रवारी सुनावली़ एका आरोपीविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने त्याची निर्दोष सुटका करण्यात आली़.
खून प्रकरणाची पार्श्वभूमी३१ जुलै २०१४ रोजी सकाळी १० वाजता शहरातील मलकापूर रोडवर शेतीतील पायवाटेच्या वादातून फिर्यादी दिलीप नाना तायडे व संतोष नाना तायडे यांच्यावर आरोपींनी प्राणघातक हल्ला केला होता़ या हल्ल्यात संतोष तायडे यांचा मृत्यू झाला.त्यामुळे संशयीत आरोपी सुभाष रूपचंद गुरचळ, स्वप्नील सुभाष गुरचळ, आशिष सुभाष गुरचळ, सुशील सुभाष गुरचळ यांच्याविरुद्ध गुरनं.५३/१४, भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४८ मुंबई पोलीस कायदा कलम ३७, ३, १ चे उल्लंघन १३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
१४ साक्षीदारांची तपासणीखून प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्या़मोरे यांच्या न्यायासनापुढे १४ साक्षीदार तपासण्यात आले़ आरोपी सुभाष व स्वप्नील हे गुन्हा घडल्यानंतर कारागृहातच होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मुख्य आरोपी स्वप्नील यास आजीवन कारावासाची तर सुभाष यास १० वर्षांची शिक्षा तर सुशील यास दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली़ स्वप्नीलविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने त्याची निर्दोष सुटका करण्यात आली़. सरकारतर्फे अॅडग़ोपाळ जळमकर व अॅड़एस़डी़सोनवणे यांनी काम पाहिले. फिर्यादीतर्फे अॅड़ जगदीश कापडे यांनी काम पाहिले. आरोपींना शिक्षा व दंडही- आरोपी सुभाष गुरचळने खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने १० वर्षांची शिक्षा तर पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला़ दंड न भरल्यास एक वर्ष कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे़- मुख्य आरोपी स्वप्नील गुरचळने खून केल्याचे सिद्ध झाल्याने आजीवान कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला़ दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा भोगावी लागणार आहे़- आरोपी सुशील गुरचळचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध झाल्याने दोन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड सुनावण्यात आला़ दंड न भरल्यास चार महिने शिक्षा भोगावी लागणार आहे़ - संशयीत आरोपी आशिष गुरचरळविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने त्याची निर्दोष सुटका करण्यात आली़ या अधिकाऱ्यांनी केला तपासखून प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत घुमरे, सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पोलीस निरीक्षक सी.डी.बनकर, सिद्धार्थ खरे, प्रभाकर पाटील यांनी केला होता. या गुन्ह्यात पैरवी अधिकारी म्हणून शरद देवरे यांनी काम पाहिले़