जळगाव : चाळीसगावपर्यंतचे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सध्या ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे भुसावळ-मनमाड तिसरा रेल्वेमार्ग २०२५ पर्यंत सेवेत दाखल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई ते दिल्ली या मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासी व मालगाड्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. त्यामुळे सध्या दर दहा मिनिटाला गाडी धावत आहे. अप व डाऊन या दोन्ही मार्गांवर गाड्यांची वर्दळ वाढमुळे रेल्वे मंत्रालयाने २०१५ मध्ये भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्यामार्गाच्या कामाला मंजुरी दिली होती. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले. २०२० मध्ये जळगावहून पुढे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. ७१ किलोमीटरचा मार्ग केवळ दीड वर्षात पूर्ण केला आहे. सध्या या मार्गावरून मालगाड्या धावत आहेत.
नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरण पूर्ण नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या ठिकाणी रूळ टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. लवकरच चाळीसगावहून पुढे नांदगावपर्यंतच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
१३६० कोटींचा खर्चभुसावळ-मनमाड तिसऱ्या रेल्वेमार्ग साकारण्यासाठी १३६० कोटींचा खर्च होणार आहे. १८३ किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग सेवेत दाखल झाल्यावर प्रवाशांना जलद सेवा मिळणार आहे.
भुसावळ ते मनमाड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. २०२५ पर्यंत या मार्गावरून प्रत्यक्षात रेल्वे धावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
पाचोरा-चाळीसगावचे कामही प्रगतिपथावरजळगाव ते पाचोरादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाचोरा ते चाळीसगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कामही हाती घेतले आहे. सध्या या मार्गावर सपाटीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले आहे. तसेच, भुयारी बोगद्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.