मुंबई : राज्य सरकारने शनिवारी पोलीस दलात तीन महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्याच्या तुरुंग विभाग प्रमुुखपदी गृह विभागाचे प्रधान सचिव डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती केली. त्याचप्रमाणे व्यापारी व वितरकांच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावणाऱ्या वैध मापनशास्त्र विभागाचे नियंत्रण संजय पांडे यांची चार महिन्यांत उचलबांगडी करून होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी बदली केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अपर महासंचालक रजनीश सेठ यांना उपाध्याय यांच्या जागेवर हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सायंकाळी गृहविभागाकडून त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आले. वैधमापन विभागाचे नियंत्रक म्हणून गेल्या १७ एप्रिलपासून कार्यरत असलेल्या संजय पांडे यांनी ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. दोन महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी त्यांची अन्यत्र बदली केली होती. त्याला ग्राहक संघटना व नागरिकांकडून तीव्र विरोध होताच ती रद्द केली. शनिवारी मात्र त्यांची तेथून उचलबांगडी करून होमगार्ड विभागात बदली करण्यात आली. पांडे हे १९८७च्या बॅचचे अधिकारी आहेत. रजनीश सेठ हे १९८८च्या बॅचचे अधिकारी असून, ते आॅगस्ट २०१४पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होते. उपाध्याय यांच्या बदलीने रिक्त झालेल्या गृह विभागात प्रधान सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आली. (प्रतिनिधी)मंगळवारी स्वीकारणार पदभारडॉ. उपाध्याय हे १९८९च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, गेल्या १६ एप्रिलपासून ते गृह विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी मुंबई वाहतूक विभागात काम करताना त्यांनी धडाकेबाज कामगिरी करीत बेशिस्त वाहतुकीला चाप लावला होता. त्याआधी त्यांच्याकडे मुख्यालयात अस्थापना विभागात विशेष महानिरीक्षक व सोलापूरच्या आयुक्तपदाची जबाबदारी होती. येत्या मंगळवारी ते पदभार स्वीकारणार आहेत.
तुरुंग विभागाच्या प्रमुखपदी भूषणकुमार उपाध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2015 2:45 AM