नितीन गडकरी : नागभूषण पुरस्कार प्रदान नागपूर : अॅड. व्ही. आर मनोहर केवळ नागपूर, विदर्भाचेच नाही तर महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांचे नाव विदर्भात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर आदराने घेतले जाते. नागभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करताना मला समाधान वाटते. हा पुरस्कार अतिशय योग्य आणि प्रतिभासंपन्न विधीज्ज्ञाला देण्यात येत असल्याचा आनंद आहे. अॅड. मनोहर हे नागपूरचे भूषण आहेत, असे मत केंद्रीय भुपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागभूषण फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा नागभूषण पुरस्कार रविवारी ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. व्ही. आर. मनोहर यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गडकरी बोलत होते. याप्रसंगी नागभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी, सदस्य डी. आर. मल, माजी खा. दत्ता मेघे प्रामुख्याने उपस्थित होते. अॅड. व्ही. आर. मनोहर यांच्या धंतोली निवासस्थानीच हा छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. एक लाख रुपये रोख, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गडकरी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेला १५० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त अॅड. मनोहर यांना मानपत्र देण्याची योजना होती. त्यांना तशी विनंतीही करण्यात आली होती पण जाहीर कार्यक्रमात येणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांचे नाव सर्वोच्च न्यायालयापर्यंत अतिशय आदराने घेतले जाते. या क्षेत्रातील त्यांची प्रतिभा मोठी आहे. त्यांना जज होण्याचीही संधी अनेकदा आली पण त्यांनी आपल्या कार्यात सातत्य ठेवणेच पसंत केले. त्यांच्यासारखा ज्येष्ठ आणि प्रतिभासंपन्न विधीज्ज्ञ आज देशात नाही आणि पुढे होणेही कठीण आहे. माझ्याकडे असलेल्या मंत्रालयाचे नवे परिवहन कायदे करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे कायदे एकदा अॅड. मनोहर यांच्या नजरेखालून जावेत, अशी माझी इच्छा आहे, ज्यामुळे नव्या कायद्यात कुठल्या समस्या निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेता येईल. त्यांना परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावे, अशी कामना यावेळी त्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना अॅड. मनोहर म्हणाले, हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी नागभूषण फाऊंडेशनचा आभारी आहे. नितीन गडकरी आणि दत्ता मेघे माझ्या कुटुंबातीलच एक आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि कुठल्याच पक्षाचा सदस्यही नाही. मी १५ वर्षाचा असताना जनसंघातर्फे माझे वडील निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांचा प्रचार करताना मी बॅनर, पोस्टर्स लावण्याचे काम जनसंघासाठी केले. १९७५ साली आणीबाणीच्या काळात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे मी विनामूल्य वकिली केली. या सगळ्याच प्रकरणात मी जिंकलो पण त्यावर सुप्रीम कोर्टाने चुकीचा निर्णय दिला.आजही माझी विचारसरणी जनसंघाचीच आहे. नितीन गडकरी ज्या सरकारमध्ये आहेत, ते सरकार स्वच्छ शासन देईल, अशी अपेक्षा मी करतो. प्रस्तावनेत गिरीश गांधी यांनी हा २०१३ सालचा नागभूषण पुरस्कार असल्याचे सांगितले. अॅड. मनोहर यांच्याकडे आम्ही नागपूरचे पालक म्हणून पाहतो. देशातील एक नामवंत कायदेपंडित अॅड. मनोहर यांना पुरस्कार प्रदान होण्याचा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला, याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले. दत्ता मेघे यांनी अॅड. मनोहर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे आभार मानले. याप्रसंगी सरहद संस्थेचे संजय नहार, भारत देसडला, मेहमूद अन्सारी, अॅड. मनोहर यांचे पुत्र सुनील, शशांक आणि कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुरस्काराचा निधी ‘वूमन्स हाऊस’ला नागभूषण पुरस्कारापोटी मिळालेला एक लाख रुपयाचा निधी अॅड. मनोहर यांनी ‘वूमन्स हाऊस’ला भेट दिला. तशी घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे हा निधी महिलांसाठी कार्य क रणाऱ्या ‘वूमेन्स हाऊस’ला प्रदान करण्यात येणार आहे.
व्ही.आर.मनोहर नागपूरचे भूषण
By admin | Published: July 07, 2014 1:09 AM