लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - केंद्रातील भाजपा सरकारने चालवलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करत युवासेनेने मीरा भाईंदर मध्ये आंदोलन व सायकल रॅली काढली.
युवासेनाच्या वतीने पेट्रोल , डिझेल , एलपीजी , सीएनजी आदी इंधन दरवाढी विरुद्ध आज रविवारी आंदोलन केले . पेट्रोल पंपा बाहेर निदर्शने केली तर सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट ) ते काशीमीरा नाका पर्यंत सायकल रॅली काढली . यावेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक स्वराज पाटील सह पवन घरत, संकेत गुरव, सागर सावंत, मंदार रकवी, उदय पार्सेकर, आराध्य सामंत, प्रियेश म्हात्रे, श्रेयस जोशी सह युवासेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी युवासेनेचे पवन घरत यांनी केंद्रातील भाजपा सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून अच्छे दिन सांगत लोकांना महागाईच्या अग्निकुंडात भाजून काढायला घेतले आहे . आत पर्यंतच्या इतिहासात इतकी मोठी इंधन दरवाढ कोणत्याच पक्षाने केली नव्हती तो विक्रम भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला आहे असा आरोप केला .
कोरोनामुळे आधीच सामान्य नागरिकांचे हाल सुरु आहेत . त्यात वाट्टेल तशी इंधन दरवाढ करून भाजपा सरकारने लोकांच्या खिश्यावर दरोडा टाकला आहे . आज भाजपा सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरला नसून विरोधी पक्षात असताना ह्याच भाजपाची मंडळी दोन चार रुपयांच्या दरवाढी वर देखील आंदोलनाची स्टंटबाजी करत होती . लोकांना भाजपाने फसवल्याचे कळून चुकले आहे असे जिल्हा समन्वयक स्वराज पाटील म्हणाले.