जळगाव/मुंबई - राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. त्यातच आज शिवसेनेने भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमध्ये भाजपाला मोठा दणका दिला आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तसेच बोधवड नगरपालिकांमधील ११ नगरसेवकांना फोडत शिवसेनेने भाजपाला भगदाड पाडले आहे. दरम्यान, या ११ नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Big blow to BJP, 11 corporators from Jalgaon district joins Shiv sena in the presence of CM Uddhav Thackeray)
भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणारे हे नगरसेवक खडसे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यापासून अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान एकनाथ खडसे समर्थक असलेल्या मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेमधील या ११ नगरसेवकांनी आज भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधत या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी शिवसेनेचे जळगावमधील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते.
या नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला प्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात जळगावमध्ये भाजपाला पडणारे खिंडार रोखण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.