विदर्भात भाजपाला मोठा धक्का, वर्धामधील जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 05:18 PM2021-11-15T17:18:06+5:302021-11-15T17:19:56+5:30
BJP News: वर्धा जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. वर्धा जिल्ह्यातील भाजपाचे जिल्हाध्यक्ष Dr. Shirish Gode यांनी भाजपाला रामराम ठोकत थेट Congressमध्ये प्रवेश केला आहे.
वर्धा - वर्धा जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. वर्धा जिल्ह्यातील भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीश गोडे यांनी भाजपाला रामराम ठोकत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच विदर्भामधील काही जिल्ह्यांत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्ह्यात काँग्रेसची जनजागरण यात्रा सुरू असतानाच गोडे यांनी सुनील केदार यांच्या उपस्थितीत कांग्रेसचा हात हातात घेतला. गोडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे बळ वाढणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या शिरीष गोडे यांनी २००८ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते.
शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील भाजपाची भूमिका आणि वाढत्या महागाईला रोखण्यात आलेल्या अपयशामुळे त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामाही पाठवला होता. यादरम्यान, पक्षाकडून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्नही झाला, मात्र अखेर आज त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपा आता जुना भाजपा राहिला नाही. पक्ष आणि नेत्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला आहे, अशी खंत पक्ष सोडताना त्यांनी व्यक्त केली. तर गोडेंकडे योग्य जबाबदारी देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिले आहे.