चिंडवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे सध्या पुणे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चिंचवडची पोटनिवडणूक काही दिवसांवर आली असताना भाजपाला मोठा धक्का बसला आहे. चिंचवडमधील स्थानिक मातब्बर नेते आणि माजी नगरसेवक तुषार कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रवेशामुळे चिंचवडमधील पोटनिवडणुकीची समिकरणे बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षांतर करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवर हे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू झाले आहे. चिंचवडमधील माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व सोडल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे या निवडणुकीसाठी कंबर कसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.
तुषार कामठे हे २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत पिंपळे निखल प्रभागातून निवडून आले होते. मात्र ते पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर कमालीचे नाराज होते. तसेच भ्रष्टाराचाविरुद्धच्या लढ्यात साथ न दिल्याचा आरोप करत त्यांनी वर्षभरापूर्वी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.