गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीदरम्याान झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत अनेक संशयितांची धरपकड केली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या फहीम खान यालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता नागपूर महानगरपालिकेने मोठी कारवाई करत फहीम खान याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. फहीम खान याच्या नागपूरमधील यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीत असलेल्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर दंगलीमधील मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने घरामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती समोर आली होती. फहीम खान याच्या घरामध्ये सुमारे ९०० चौरस फुटांचे बांधकाम अनधिकृत असल्याची बाब समोर आली. नागपूर महानगरपालिकेने त्याला तत्काळ नोटीस बजावली होती. तसेच त्याच्या घरीदेखील एक प्रत दिली. हे अतिक्रमण तातडीने पाडण्याची कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आले दरम्यान, आज सकाळी फहीम खान याच्या घरावर तोडक करावाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी बुलडोझर आणि इतर सामानासह हजर झाले. तसेच फहीम खान याच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, सोमवारी महाल, हंसापुरी परिसरात झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या घटनेनंतर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानला अटक करण्यात आली होती. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्द्यावरून रविवारी सकाळच्या सुमारास महालच्या शिवाजी पुतळा परिसरात आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर फहीम खानने षडयंत्र रचून जमावाच्या भावना भडकाविल्या व त्यातून जाळपोळ सुरू झाल्याच्या त्याच्यावर ठपका आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचादेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.