महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपून आठवडा होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष आणि प्रवक्ते धीरज शर्मा यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. धीरज शर्मा यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही धीरज शर्मा हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. तसेच या लोकसभा निवडणुकीसाठी शर्मा यांच्यावर पक्षाकडून अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचं नाव होतं. तसेच त्यांनी अनेक प्रचारसभाही घेतल्या होत्या.
गतवर्षी अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. तसेच पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले होते. तसेच महाराष्ट्रातील अनेक आमदार आणि पदाधिकारी अजित पवार गटात गेले होते. आता पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सर्व पदांचा दिलेला राजीनामा हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.