Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसताना पाहायला मिळत आहेत. अलीकडेच सुमारे १२ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला. यानंतर आता सुमारे २५ वर्षांहून जास्त काळ शिवसेनेत असलेल्या बड्या नेत्याने पक्षातील वरिष्ठांच्या धोरणांना कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे सांगितले जात आहे.
अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जेष्ठ नेते आणि शिवसेना प्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविल्याचे सांगितले जात आहे. यासह महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांना पाठविला आहे.
अकोल्यातील ठाकरे गटात मोठी खळबळ
विजय मालोकारांच्या राजीनाम्याने अकोल्यातील ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. विजय मालोकारांच्या पुढच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. मालोकार यांच्याकडे उत्कृष्ठ संघटक म्हणून पाहिले जाते.
दरम्यान, सन १९९९ मध्ये मालोकार यांना तत्कालीन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत पक्षाने डावलल्यामुळे मालोकार अपक्ष म्हणून निवडणुक लढली होती. यात २००४ मध्ये ४० हजार मते मिळत अल्पमतांनी पराभूत व्हावे लागले होते. विजय मालोकार यांनी १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक म्हणूनही काम पाहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"