एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला रामराम ठोकत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र अनेक नेते अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. मात्र आता शिवसेनेचा वर्धापन दिन एका दिवसावर आला असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेच्या अभ्यासू आणि फायरब्रँड प्रवक्त्या मानल्या जाणाऱ्या मनीषा कायंदे ह्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
१९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना ह्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, या वर्धापन दिनापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील आमदार असलेल्या मनीषा कायंदे ह्या गेल्या काही काळापासून ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आज सकाळपासून मनीषा कायंदे ह्या नॉट रिचेबल आहेत. मनीषा कायंदे ह्या आता शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मनीषा कायंदे ह्या ठाकरे गटाने आयोजित केलेल्या शिबिराला अनुस्थितीत आहेत. त्यामुळे वर्धापनदिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटात जाण्याबाबतच्या वृत्ताबाबत विचारले असता ते म्हणाले की, कचरा हा इकडे तिकडे उडत असतो. तो कचरा हवेचा झोका बदलला की पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. दुर्लक्ष करा त्याकडे. ही काही फार महान लोकं नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.