मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती सुरूच आहे. शिंदेंसोबत गेलेले सिंधुदुर्गातील आमदार दीपक केसरकर यांनी आज उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपतालुकाप्रमुखांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपजिल्हाप्रमुखांनी आज भेट घेत युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे काम बाळासाहेबांची_शिवसेना करत असल्याने पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये सचिन देसाई, सुनील डुबळे आणि बाळा दळवी यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रतापराव जाधव उपस्थित होते.