मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र निर्माण झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश सरकारला दिले. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यामुळे आता राज्यात पुढील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्यात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यात आज संध्याकाळी उशीरा राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे हे तिघे शपथ घेऊ शकतात. मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी सी.टी रवी उपस्थित होते. याच बैठकीत दिल्लीहून शपथविधी सोहळा पार पाडण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यात अस्थिर राजकीय वातावरण असताना लवकरात लवकर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. अनेक कामे खोळंबली आहेत. त्यात काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत अशा परिस्थिती वेळ न दवडता सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने शपथविधी करून घ्यावा असा संदेश दिल्लीहून आला आहे. शपथविधी सोहळ्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार समोर येत असल्याची माहिती आहे.
ज्यांना मोठे केले तेच विसरले - उद्धव ठाकरेसुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी आलोच अनपेक्षितपणे. जातो पण तसाच आहे. मी पुन्हा येईन, म्हणालो नव्हतो, असे सांगतानाच उद्धव यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर आगपाखड केली. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तरी मला लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही.
शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही. उद्या हे येणार म्हणून मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसैनिकांना नोटीसा आल्या आहेत. केंद्रीय पथके आली, लष्करही बोलावले जाईल. एकाही शिवसैनिकाने बंडखोर आमदारांच्या मध्ये येऊ नये. लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी असतात. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. त्याचा आनंद त्यांना साजरा करायचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना अडवू नये, असे आवाहन त्यांनी केले