मुंबई : काल संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राज्यपालांचे पत्र मिळाले. आम्ही 24 तासांच्या आत दोन पक्षांसोबत चर्चा सुरू केली. आम्हाला 7.30 वाजेपर्यंतची मुदत होती. राज्यपालांना वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. वेळ नाकारली तरीही दावा नाकारलेला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेकडे पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. याबाबतचा संदेश त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. त्याप्रमाणे शिवसेनेने राज्यपालांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन दिवस लागतील. पुढे काय असेल माहिती नाही. राष्ट्रपती राजवट लागेल की दुसऱ्या पक्षांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळेल. पण बहुमताचा आकडा घेऊन शिवसेना पुन्हा येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
या सगळ्या पार्श्वभुमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे किंवा राज्यपाल कोश्यारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्तास्थापनेचे निमंत्रण देतात याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यपालांच्या कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी केले असून शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले मात्र त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले नाही. सरकार स्थापन करण्याच्या दाव्याचे पत्र दिले आहे. तसेच अन्य पक्षांच्या पाठिंब्याचे पत्र देण्यासाठी शिवसेनेने 3 दिवसांचा वेळ मागितला होता. तो नाकारण्यात आला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.