Lokmat Maharashtrian of the year awards 2024: लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला गेल्याने राजकीय वादंग उठला होता. यावरून फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी मोठा भाऊ हा मोठाच असतो, गुजरात कधीही महाराष्ट्राला मागे टाकू शकत नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी घेतली.
हजारो विमाने आपल्याकडे येत आहेत. सर्वात मोठी ऑर्डर एअर इंडियाने दिली आहे. त्यांच्या लक्षात आले की पायलट ट्रेन केले पाहिजेत. कारण एवढी विमाने येतील पण पायलटच नसतील तर उपयोग काय. त्यांनी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अमरावतीच्या विमानतळावर उभारण्याचे ठरविले आहे. कालच प्रेझेंटेशन झाले. ही इन्स्टिट्यूट आशियातील सर्वात मोठी आहे. राज्यातील जे जिल्हे तुलनेने मागे राहिलेत त्या जिल्ह्यांमध्ये देखील एवढ्या असिमित संधी पहायला मिळत आहे. आमचे सरकार त्या संधी कशा उपयोगात आणता येतील हे पाहतेय. महाराष्ट्रा हा अनस्टॉपेबल आहे, असे फडणवीस म्हणाले.
यावर गुजरातची भीती वाटत नाही का? असा सवाल विजय दर्डा यांनी विचारला असता. गुजरात एक सक्षम राज्य आहे. गुजरातची लोक फार उपक्रमशील आहेत. पण शेवटी मोठा भाऊ हा मोठाच असतो, असे फडणवीस म्हणाले. यावेळी दर्डा यांनी त्यांना मोठा भाऊ म्हणजे पंतप्रधान आणि छोटा भाऊ म्हणजे गृहमंत्री असे विचारले असता फडणवीस यांनी आमच्या नेत्यांमधील मोठे भाऊच राहणार ते असे फडणवीस म्हणाले.
मुंबई राज्य होते तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात ही एकाच दिवशी दोन राज्ये झाली. महाराष्ट्र हा मोठा भाऊ होता, लहान भाऊ हा गुजरात होता. मोठा भाऊ हा मोठाच राहील. लहान भावाच्या प्रगतीने आपल्याला दु:ख होण्याचे कारण नाही. त्याची प्रगती झाली तर उत्तमच आहे. मोठा भाऊ मागे राहणार नाही, लहान भाऊ मोठ्या भावाला मागे टाकू शकणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.