ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १८ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून 'पीएचडी'साठी नोंदणी करणे कठीण होणार आहे. यंदा 'पेट' (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) दोन टप्प्यांत होणार असून १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. २५ जुलैपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.'आयटी रिफॉर्म्स'चा अवलंब करीत असताना नागपूर विद्यापीठतील 'पीएचडी' प्रक्रियादेखील 'आॅनलाईन' करण्यात आली आहे. यात अर्ज सादर करण्यापासून ते अगदी 'सिनॉप्सिस'चे सादरीकरणदेखील 'आॅनलाईन' पद्धतीनेच होत आहे. शिवाय आजच्या तारखेत 'नेट' किंवा 'सेट' उत्तीर्ण असलेले किंवा संशोधन तसेच ठराविक वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेल्यांना 'पेट'पासून सूट देण्यात येते. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांत असे काहीही नाही. त्यामुळे ही सूट विद्यापीठातूनदेखील काढण्यात आली आहे.'पेट'साठी २५ जुलैपासून अर्ज दाखल करणे सुरू होणार आहे. १, २, ३ सप्टेंबरला आॅनलाईन पद्धती व २५ सप्टेंबरला आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षा दोन टप्प्यांत राहणार आहे. पहिल्या टप्प्यांत 'लॉजिकल रिझनिंग'वर आधारित 'अॅप्टिट्यूड टेस्ट' राहणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे 'पेट' उत्तीर्ण करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर राहणार आहे.
उमेदवारांसमोर 'पेट'चे मोठे आव्हान
By admin | Published: July 18, 2016 8:48 PM