Maharashtra Politics: “अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत... तेही लवकरच”; ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:47 AM2023-04-12T11:47:19+5:302023-04-12T11:49:35+5:30
१५ आमदार बाद होण्याचा दावाही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढत असून, शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालायने दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. मात्र, ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते सर्वोच्च न्यायालयावर विश्वास दाखवत शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील, असा दावा करत आहेत. मात्र, यातच आता अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून आजही गौप्यस्फोट, दावे-प्रतिदावे सुरूच असल्याचे दिसत आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केला आहे.
अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत... तेही लवकरच
अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.... तेही लवकरच बघू..... आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून या प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट दिली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने एक आरोपपत्र दाखल केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"