नाशिक - मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांवर निशाणा साधला. एक कांदा ५० खोक्यांना विकला गेला असं म्हणत ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे आमदार सुहास कांदे यांना टार्गेट केले. त्यावरून आता सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा जनतेसाठी दिला नाही तर पाटणकरांची चौकशी थांबवण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी दिला असा गौप्यस्फोट आमदार सुहास कांदे यांनी केला.
आमदार सुहास कांदे म्हणाले की, श्रीधर पाटणकरांची चौकशी थांबवण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ज्यावेळी श्रीधर पाटणकर यांना अटक होईल. त्यानंतर ती चौकशीची सुई कोणाकडे जाईल? श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत जे कुणी संचालक आहेत त्यांचीही चौकशी होईल आणि अटक होईल. त्या तडजोडीवर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला हे जनतेला मी सांगतो. जर हे खोटे वाटत असेल तर माझी आणि उद्धव ठाकरे दोघांचीही नार्कोटेस्ट करा असं आव्हानही त्यांनी दिले.
तसेच आमच्यावर खोक्यांचा आरोप करता मी १० कंत्राटदारांची नावे सांगतो, त्यांच्याकडून तुम्ही किती पैसे घेतले? त्याचीही नार्कोटेस्ट होऊ द्या. MEP-IRB कंपनीकडून किती खोके मातोश्री आणि वर्षावर आले? मी फक्त ४ प्रश्न विचारतो. सरकार बदलण्यासाठी मी एकही पैसा घेतला असं सिद्ध झाले तर मी या राजकारणाचा १०० टक्के सन्यास घेईन. मुंबई महापालिकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. आता भावनेचे राजकारण बंद करा. राजीनामा का दिला हे आम्हाला सांगायला लावू नका असा इशाराही आमदार कांदे यांनी दिला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची सभा फक्त टोमणे देण्यासाठी होती. ती सभा तरूणांना कुठलीही दिशा देणारी नव्हती. शेतकऱ्यांना दिशा देणारी नव्हती. ही टोमण्याची सभा होती. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंची दया आली. उद्धव ठाकरे गद्दार, गद्दार म्हणतात, ज्या बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं, बाळासाहेबांना जेलमध्ये टाकले. त्यांना त्रास दिला त्यांच्यासोबत हे आहेत. उद्धव ठाकरेंनी भावनेचे राजकारण बंद करा असंही आमदार सुहास कांदे म्हणाले.