शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद अडचणीत आले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने १६ बंडखोर आमदारांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे शिंदे गट अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची देखील चर्चा आहे. या साऱ्या घडामोडींवर मोठी माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे हे दोनवेळा राजीनामा देण्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. २१ जून आणि २२ जून अशा दोन दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, असे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी २० जूनला मध्यरात्रीच शिवसेनेचे आमदार सूरतला हलविले आणि दुसऱ्या दिवशी राज्यात भूकंप झाला. यावर ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते. याची कुणकुण लागताच मविआच्या एका बड्या नेत्याने त्यांची समजूत घातली आणि ठाकरेंनी राजीनामा खिशात ठेवल्याचे सांगितले जाते. ठाकरे यांनी यावेळी माझा राजीनामा घेऊन जा, असे बंडखोर आमदारांना म्हटले होते.
यानंतर दुसऱ्या दिवशी 22 जूनला ठाकरे राज्यातील सचिवांसोबत ऑनलाईन आभार प्रदर्शन करणार होते. या बैठकीतही ते राजीनामा देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही बैठक पुढे ढकलण्यात आली. यामुळे यावेळीही ठाकरे यांनी राजीनामा दिला नाही. दुसरीकडे शिंदे गटाने आता ठाकरेंनी सन्मानाने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.