- भारत चव्हाण लोकमत न्युज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आधी बैठकीत प्रवेश नाकारल्यामुळे तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का घेतली असा जाब विचारत हा गोंधळ झाल्याने बैठकीला गालबोट लागले.
शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसानी दारावर रोखले. आम्हाला ब्रिफींग करायचे आहे असे सांगत आत सोडण्याची विनंती केली. पण आत खोलीत बसायला जागा नसल्याचे कारण देत पोलिसांनी प्रवेश नकाराला. यावेळी दरवाजावर बराच गोंधळ उडाला. पंधरा मिनिटांनी बैठक संपली. आतील कार्यकर्ते बाहेर येत असताना पुण्यातील कार्यकर्ते आत घुसले आणि अजित पवार यांच्या समोर गोंधळ घालण्यास सुरवात केली. यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. पण योगेश केदार यांनी हातातील फाईल पवार यांच्यसमोर टेबलवर आपटल्या. बंद खोलीत बैठक का घेताय असा जाब विचारला.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'जिल्हाधिकारी कार्यालय‘ प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..