पुणे : सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून कमळातील 'शनिवारवाडा' काढून जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह पंधरा संस्थांनी केली आहे. मात्र शनिवारवाडा हा पुण्याचा नव्हे तर देशाचा मानबिंदू आहे असं सांगत या मागणीला अखिल भारतीय ब्राहमण महासंघाने बोधचिन्ह बदलण्यास विरोध केला आहे. या परस्परविरोधी मागण्यांमुळे नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 1948साली तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे 1950साली कमळात शनिवारवाडा असे बोधचिन्ह तयार करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचे फुले यांच्या नावाने नामांतर करण्यात आले आहे. मात्र सध्यातरी बोधचिन्ह बदलण्यात आलेले नाही.त्यामुळे बोधचिन्हात तात्काळ बदल करावा व फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावा अशी मागणी काही संस्थांनी केली आहे. यावेळी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे सचिन माळी म्हणाले आहेत की, शनिवारवाडा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. शनिवारवाडा हा बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या गुलामगिरीचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्याप्रमाणे पुण्यातही फुले यांची प्रतिमा वापरावी. मात्र या मागणीला विरोध करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी असा मूर्खपणा सरकारने किंवा विद्यापीठ प्रशासनाने केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत ते म्हणाले की, या वाड्यात केलेला राज्यकारभार हा मराठा साम्राज्यासाठी महत्वाचा असून तो कोणालाच पुसता येणार नाही. शनिवारवाड्याची प्रतिमा विद्यापीठ बोधचिन्हातून हलवण्याच्या ओबीसी सत्य शोधक फेडरेशनच्या मागणीचा आम्ही तीव्र धिक्कार करीत आहोत अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ही परिस्थिती बघता विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेते हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हावरुन वाद : ओबीसी फेडरेशनच्या मागणीला ब्राहमण महासंघाचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 8:19 PM