पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या ११ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणाऱ्या दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र बदलून देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.विद्यार्थ्यांनी या पूर्वी निवडलेले परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले असून येत्या २१ ते २६ ऑगस्ट या कालावधीत नवीन परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.त्यातही जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची क्षमता विचारात घेऊन प्रथम येणाऱ्याला प्रथम संधी या तत्त्वानुसार संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे. एमपीएससीतर्फे २८ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ३ मे रोजी घेतली जाणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.परंतु,१७ जून रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार येत्या ११ ऑक्टोबर रोजी दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२० घेतली जाणार आहे.जाहिरातीस अनुसरून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र परीक्षेसाठी निवडले होते.परंतु,राज्यातील विविध शहरांमधील कोरोनाची स्थिती, खोडोपाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेकरिता उपस्थित राहण्यासाठी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी,पुण्यासह विविध शहरांमध्ये वास्तव्यास असलेले विद्यार्थी कोरोनामुळे आपल्या मुळ गावी दुसऱ्या जिल्ह्यात परतले आहेत.सध्य स्थितीतील प्रवासावर व तात्पूरत्या वास्तव्यावर निर्बंध आहेत.या सर्व बाबींचा विचार करून ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी पसंतीचे जिल्हाकेंद्र निवडण्याची मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. जाहिरातीस अनुसरून अर्ज करताना विद्यार्थ्यांनी पूर्वी निवडलेले जिल्हा केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे जिल्हाकेंद्र निवडण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यांमधील शाळा/ महाविद्यालयांच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक जिल्हा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कमाल क्षमता निश्चित करण्यात आली आहे.ही क्षमता लक्षात घेवून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा असणार आहे. परंतु, संबंधित जिल्ह्याची कमाल क्षमता संपुष्टात आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या जिल्हा केंद्राची निवड करता येणार नाही. मर्यादित कालावधीत जिल्हाकेंद्राची निवड न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जातील कायमस्वरूपी रहिवासी पत्ता असलेल्या जिल्हातील परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. मात्र, एखाद्या जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या किंवा निवड करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या जिल्हाकेंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य असेल. तसेच नव्याने जिल्हा केंद्र निवडण्याकरिता सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल दूरध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल,असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
'एमपीएससी'चा मोठा निर्णय ; दुय्यम सेवा पूर्व परीक्षा केंद्र बदलण्याची विद्यार्थ्यांना मुभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 17:19 IST
येत्या २१ ते २६ ऑगस्ट या कालावधीत नवीन परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.
'एमपीएससी'चा मोठा निर्णय ; दुय्यम सेवा पूर्व परीक्षा केंद्र बदलण्याची विद्यार्थ्यांना मुभा
ठळक मुद्देयेत्या ११ ऑक्टोबर रोजी दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२० घेतली जाणार